Posts

 सख्या.. कौतुक करणारी, भांडणारी.. बोल लावणारी, प्रेम करणारी.. माणसंच माणसं भोवताली, तरी मनाच्या  तळाशी, मी एकटीच पडलेली... सुंदर, देखणी, नटलेली.. भरकटलेली, विस्कटलेली.. माणसंच माणसं भोवताली, तरी मी हरवलेली.....
 सख्या... दिलेल्या हाका, ऐकायला कुणी नसेल, तर, त्या वाटेवर, एकट्यानेच चालावं.. जर वाटेने हात दिला, तर, त्या वाटेलाच ध्येय समजावं.....

सख्या..

 मनाच्या प्रदेशात, चुकून उगवते, कविता बिविता..

सख्या..

 कधीकधी, असं वाटतं, उगीच, उगीच उजाडतं.. ती गूढरम्य वाट संपून, एक्दमच पोहचून जातो.. ते स्वप्न गूढ सुंदर, ती वाट मऊ धूसर, उगवता सूर्य सगळंच, चक्क उजळून टाकतो... नकोच स्वप्न भंगणं, नकोच ते  उजाडणं, शेवटी दुस्तर वाटेवर, अडखळत चालणं.....

सख्या...

 रानच्या वाटा वाटांत गुरफटल्या, मन च्या वाटा पावलांत अडखळल्या.. अंधारणाऱ्या मनात प्रश्नांच्या सावल्या, अंधाऱ्या रानात लांबलेल्या सावल्या.....

सख्या..

 किती पुढे निघून आले, नाती निभावता निभावता.. स्वतःलाच हरवून बसले, नाती घडवता घडवता.. लोक मला म्हणतात, तू हसतेसच फार, अन् मी थकून गेले, दुःखे लपवता लपवता.. सुखी,सुखी होते मी, दुसऱ्यांना आनंद देता देता, माझी  काळजी  नाही करत, दुसऱ्यांची पर्वा करता करता. रंगून जाते  मी, सुखाची फुलं वेचता वेचता, माझं काही मोल नाही, अनमोल नात्यांना निभावता, निभावता....

सख्या...

 सख्या.. भूमीला ओढ असते, सजल सावळ्या घनाची.. प्रतीक्षा असते, तो वर्षेल, बरसेल.. मग  कुठे एक  टपोरासा दवबिंदू येतो.. तसा तुझा शब्द......

सख्या..

संकटे, सांगून येत नाहीत कधी,  आणि, एकटीही,  हातात हात घालून येतात...  मुकाबला करण्याचे बळही,  संकटेच देतात.. 

सख्या..

प्रदीर्घ काळ जावा लागतो,  न्याय  मिळायला,  कधी कधी जन्म देखील...  अन्याय मात्र त्वरित  होतो... 

सख्या...

काळच करतो घात,  काळच उडवतो छत,  काळच देतो छेद,  काळच बनतो औषध... 

सख्या...

जळालेली जमीन मी,  अंकुराचा मागमूस नाही,  डोळ्यामध्ये टिपूस नाही... 

सख्या..

असा कसा?  तू बुजरासा,  डोळ्यात हळवा कवडसा... 

सख्या...

तू गेलास दूर निघून,  बरेचसे पाणी वाहून गेले पुलाखालून,  अन शेवटी, पूलही गेला वाहून... 

सख्या...

वाटेवरून, पुढे जाता जाता,  रस्ता, मागे गेला,  आणि स्नेह ही... 

सख्या...

देखण्या भविष्याचा,  मखमली रुजामा उलगडे,  खाली  दडलेत,  भूतकाळाचे खाचा - खड्डे... 

सख्या...

नदीच्या पुरासारख्या,  आठवणी मनात धावून येतात,  मलाच वाहून नेतात... 

सख्या..

पुलाखालून धो धो पाणी वाहून गेलं,  तरीही नदी वाहतेच आहे, दुथडी भरून..  डोळ्यांमधून  अलोट अश्रू वाहून गेले, तरीही हसू फुटतंय अजून, आतून, कुठून? ... 

सख्या..

माणसाला,  त्याने दिलेल्या उत्तरावरून नव्हे,  तर, त्याने  विचारलेल्या  प्रश्नावरुन, ओळखावे... 

सख्या..

कालची कळी मिटलेली,  नि आजची, उमललेली..  मधे असतात का उमलण्याच्या कळा?  कुणी जाणून घेतल्या ?

सख्या..

गच्चं  भरून  आलेलं,   आभाळ बघायला,  दारा पर्यंत आले..  तू असं नको समजूस  की,  तुझी वाट पहायला,  अशी उभी राहिले...