सख्या ...

तू सांग , नाही तर ,
सांगू नकोस काही ..
ते तुझ्या -माझ्यातलं,
विरूनसं गेलंय कांही ...
आठवतंय ना पाणंदीवर ?
गवताच्या पात्यांवर ,
चमकणारं ते  दहिवर..
त्यांच्या चिमुकल्या आकाशात,
सारं विश्व थरथरत राही ..
त्यांत भिजत पावलं ,
तुझीही , माझीही ..
तुझ्या ओल्या पावलांचा ,
आज माग सापडत नाही ..
ते तुझ्या -माझ्यातलं ,
विरूनसं गेलंय काही ....
किती  गूज करत ,
बसलो त्या कातळावर ..
दाखवलं होतंस मला ,
ते रानफूल  लाजणारं..
खुडलं नाहीस  तूही ,
नाही खुडलं मीही ..
कुठे दूर वाऱ्याबरोबर ,
उडून गेलं का तेही ?
गंध मात्र माझ्याभोवती ,
अजून दरवळत राही ...
तू सांग,  नाहीतर ,
सांगू नकोस काही ..
ते तुझ्या माझ्यातलं ,
विरूनसं गेलंय कांही .......

Comments

Popular posts from this blog

सख्या ...

सख्या...