अन्‍नदान...

Tuesday, October 9, 2007
अन्‍नदान...

परवा गंगेच्‍या काठावर फिरत असताना,एका खाणावळवाल्‍याचा बोर्ड वाचला, १००/५००/१००० माणसांना अन्‍नदान येथे करता येईल.राईसप्‍लेट,पुरी-भाजी,लाडू इ.चे दरपत्रकही लावले होते. मनाला एकदम बरे वाटले की,आता पितृपक्ष, वाढदिवस इ.च्‍या निमित्ताने लोकांना जेवू घालता येईल. मग त्‍या माणसाला भेटून,चौकशी करून, advance ही देऊनआलो,आजचं जेवण नक्‍की करून...आज बरोब्‍बर साडेबाराला तिथे पोचलो.खाणावळीसमोरच गाडी ठेवली व आत गेलो.स्‍वच्‍छ स्‍वयंपाकघर,स्‍वच्‍छ भांडी,स्‍वच्‍छ टेबलं..त्‍याने बसायला सांगितले तिथे बसलो.३/४ जणांची लगबग चालली होती.त्‍यांनी हळूहळू ४/५ मोठाली भांडी टेबलावर आणून ठेवली.एका मोठ्‍या पातेल्‍यामध्‍ये बटाट्‍याचा रस्‍सा, ३ मोठी भांडी भरून पुर्‍या व एका पिशवीत ३/४ किलो बुंदीचे लाडू; भांडी, अन्‍न अगदी स्‍वच्‍छ होते. बाहेर हळूहळू वर्दळ वाढू लागली होती. लहान-मोठी मुले, उघडी-वाघडी, झिपरी मुले आत डोकावून भांड्‍यांकडे नि आमच्‍याकडे बघत होती.मुली ढगळ कपडे व झिपर्‍या सावरत भोवती फिरत होत्‍या.नदीवरही स्‍नाने करणार्‍यांची, कपडे धुणार्‍या लोकांची लगबग सुरू होती.या नाशिकच्‍या गोदाघाटावर नेहमीच फिरस्‍ते,प्रवासी,भिकारी यांची गर्दी असते.क्रियाकर्मे, अस्‍थि-विसर्जन करणारी माणसे बोडक्‍या डोक्‍यांनी फिरत असतात, स्‍नाने करत असतात. बाया तशाच उघड्‍यावर आंघोळी, कपडे आटपत असतात.त्‍यांच्‍यातल्‍याही काही टेबलाकडे लक्ष ठेवून होत्‍या.मोहमाया सोडलेले so-called भगवे साधूही कोंडाळे करून इकडेच बघत होते. हातात कमंडलू, कडीचे डबे होते. खाणावळवाल्‍यांची व्‍यवस्‍था झाल्‍यावर,वाढायचा हाकारा केल्‍यावर,एकच झुंबड उडाली.आधी त्‍यांनी मला सगळ्‍या भांड्‍यांना हात लावायला सांगितले.२ पुर्‍या,त्‍यावर भाजी व लाडू असे माझ्‍या हातात देऊन,नदीत सोडून यायला सांगितले. मी निघाल्‍यावर एक पोरगा मला गाइड करायला माझ्‍या बरोबर आला..सोडा ना,जाईल ते पाण्‍यात;आता नमस्‍कार करा.....
नमस्‍कार करून, परत टेबलाकडे आलो,तोवर वाढायला सुरवात झालीच होती.पोरे मला-मला करत होती,धक्‍का-बुक्‍की करत होती.मोठी माणसे जरा मागे होती.म्‍हातार्‍या बाया एकीकडे,भिंतीशी उभ्‍या होत्‍या.साधूंचे कोंडाळेही अधीर झाले होते.सर्वांच्‍या नजरेत तीच ती आदिम भूक,जी माणसाला पोटासाठी काहीही करायला लावते. बरेवाईट वागायला भाग पाडते; लाज-संकोचही नष्‍ट करते, ती भूक! गोळाभर अन्‍नासाठी इतकी अजिजी,हातघाई करणारी ती माणसे बघून माझ्‍या पोटात कालवलं अगदी! रडू यायला लागलं.डोळे घळाघळा वाहू लागले. इतकं अन्‍न, इतकी मुलेमाणसे बघूनही खूप अपुरं-अपुरंसं वाटायला लागलं.कोण आम्‍ही? कितीसं अन्‍न?कुणाकुणाला पुरे पडणार ते?कशी भागणार भूक?ह्‍यांचीही स्‍थिती काही वेगळी नव्‍हती.आधी आम्‍ही विचार केला होता की,आपण बनवून आणू व आपल्‍या हातांनी वाढू,असं. पण आता बघत होतो की, हे असं वाढणं नि इतक्‍या लोकांना हाताळणं आम्‍हांला जमलं नसतंच! आमच्‍याने तर हे बघवलंही जात नव्‍हतं..आम्‍ही असाही विचार केला होता की, आपण त्‍यातलीच पुरीभाजी खाऊन घेऊ,प्रसाद म्‍हणून..म्‍हणून बाईंना दुपारी स्‍वयंपाकाला नको असं सांगितलं होतं;पण, तिथे खाणंही आम्‍हांला शक्‍य वाटत नव्‍हतं.बघता बघता अन्‍न संपत आलं.माणसंही आटोक्‍यात आली होती.पोरं हात रिकामे करून,पुन:पुन: मागायला येत होती.४/५ साधू तिथेच घोटाळत होते. मग ह्‍यांनी हिशेब चुकता केला व आम्‍ही निघालो.साधू खिडकीजवळ आले; खाना दिया,लेकिन दक्षना किधर मिली?..झालं..ह्‍यांना उखडायला वेळ लागणार नव्‍हता. पटकन्‌ पर्समधून ४०/५० रुपये काढून दिले नि निघालो, भरल्‍या मनाने,वाहत्‍या डोळ्‍यांनी आणि रिकाम्‍या पोटांनी.......

Comments

sonal m m said…
देणार्‍याने देत जावे घेणार्‍याने घेत जावे
घेणार्‍याने घेता घेता देणार्‍याचे हातंच घ्‍यावेत..

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

उपनिषद चिंतन : - ६

प्राण्‍यांवरचे प्रेम...?