Posts

Showing posts from 2020

सख्या..

संकटे, सांगून येत नाहीत कधी,  आणि, एकटीही,  हातात हात घालून येतात...  मुकाबला करण्याचे बळही,  संकटेच देतात.. 

सख्या..

प्रदीर्घ काळ जावा लागतो,  न्याय  मिळायला,  कधी कधी जन्म देखील...  अन्याय मात्र त्वरित  होतो... 

सख्या...

काळच करतो घात,  काळच उडवतो छत,  काळच देतो छेद,  काळच बनतो औषध... 

सख्या...

जळालेली जमीन मी,  अंकुराचा मागमूस नाही,  डोळ्यामध्ये टिपूस नाही... 

सख्या..

असा कसा?  तू बुजरासा,  डोळ्यात हळवा कवडसा... 

सख्या...

तू गेलास दूर निघून,  बरेचसे पाणी वाहून गेले पुलाखालून,  अन शेवटी, पूलही गेला वाहून... 

सख्या...

वाटेवरून, पुढे जाता जाता,  रस्ता, मागे गेला,  आणि स्नेह ही... 

सख्या...

देखण्या भविष्याचा,  मखमली रुजामा उलगडे,  खाली  दडलेत,  भूतकाळाचे खाचा - खड्डे... 

सख्या...

नदीच्या पुरासारख्या,  आठवणी मनात धावून येतात,  मलाच वाहून नेतात... 

सख्या..

पुलाखालून धो धो पाणी वाहून गेलं,  तरीही नदी वाहतेच आहे, दुथडी भरून..  डोळ्यांमधून  अलोट अश्रू वाहून गेले, तरीही हसू फुटतंय अजून, आतून, कुठून? ... 

सख्या..

माणसाला,  त्याने दिलेल्या उत्तरावरून नव्हे,  तर, त्याने  विचारलेल्या  प्रश्नावरुन, ओळखावे... 

सख्या..

कालची कळी मिटलेली,  नि आजची, उमललेली..  मधे असतात का उमलण्याच्या कळा?  कुणी जाणून घेतल्या ?

सख्या..

गच्चं  भरून  आलेलं,   आभाळ बघायला,  दारा पर्यंत आले..  तू असं नको समजूस  की,  तुझी वाट पहायला,  अशी उभी राहिले... 

वीण..

वीण, काडी काडीची,  वीण, प्रेमाच्या धाग्यांची,  वीण, देहाची - मनाची,  वीण, जन्म जन्मांतरीची... 

सख्या..

अनिवार पाणी,  मिळाली वाट, तर वाहून जातं.. नाही मिळाली वाट,  तर सारं काही वाहून जातं... 

सख्या...

देवाच्या पायांवर,  फुलांची लयलूट,  वेलीपासून ताटातूट... 

सख्या...

स्मरणाच्या फुलांनी,  भरली ओंजळ..  आता मात्र पानगळ... 

सख्या...

काळीकुट्ट सावलीही,  विश्वास देते  की,  मागे प्रकाश झगमगतोय... 

सख्या..

चमकदार डोळयांत,  काजळाची रेघ,  निळ्या सावळ्या  ढगावर,  विजेची रेघ... 

सख्या...

वणव्याला घाबरून,  धावतोय  सैरावैरा,  भणाणता रानवारा... 

सख्या..

स्वप्नं,  जड होतात,  गरीबाच्या डोळ्यांना,  नि, सांडून जातात... 

सख्या..

अवचित  पाहिलं,  इकडे तिकडे,  तू मनात डोकावलास ना... 

सख्या..

ओढाळ वेड्या लाटांची,  चित्तरकथा प्रीतीची,  क्षणिक भेट किनाऱ्याची,  पुन्हा  वाट परतीची... 

लाटा...

अवखळ लाटांचा,  रात्रभर धिंगाणा,  किनारा दिवाणा... 

दिवे..

गूढ अंधारात,  चमकणारे काजवे,  आशेचे दिवे... 

सख्या..

पाऊलवाट  नेहमीची,  पायाखालची, सवयीची,   तरीही आज ठेच लागली,  आठवण आली का कोणाची? ... 

सख्या..

मन मरून गेलंय,  तरी जगावं लागतंय,  छातीत ठोके वाजतायत  तोवर... 

सख्या ..

जगू शकतेय तुझ्याशिवाय,  पण मरणार मात्र नाही,  तुला पाहिल्याशिवाय... 

सख्या..

काट्याने  निघतो काटा,  विषावर उतारा विषाचा,  तर द्वेषाच्या पाण्याने,  धुता येईल का द्वेष?... 

सख्या..

लढण्यासाठी, रडण्यासाठी,  आणि तिरडीसाठीही,  लागतोच की... खांदा.. 

सख्या..

झिजलेल्या  वस्त्राला,  ठिगळ लावता येईल,  पण..  विरलेल्या नात्यांना?  फाटलेल्या आभाळाला?  भेगाळलेल्या जमिनीला?   कसं रे ??.. 

सख्या..

प्रेम जुनं, पुस्तकही जुनं,  जुन्या पुस्तकासारखं  मनही सुनं..  सुगंधाच्या वाटेवर,  जुळतील का  पुन्हा मनं? .. 

सख्या..

जुनं पुस्तक उघडताच,  पडला एक वाळका गुलाब..  आता त्याच्या सारखाच,  प्रेमात उरला  नाही  आब... 

सख्या..

फुलं कोमेजलेली..   गंध तसाच कायम तरी,  तुझ्या अथांग प्रेमापरी... 

सखे..

वाटेवरची दोनचार सुगंधी फुलं,  जुन्या शर्टाच्या खिशात सापडली..  माझ्या  खांद्यावर  डोकं ठेवून,  बसली  होतीस  कधी काळी... 

सख्या..

रस्त्यातल्या फुलांचा,  धुंद गंध दरवळला..  मुक्काम  तिथेच हरवला... 

सख्या..

खाचा खळग्यांची वाट,  एकटीच चालले..  जमीन जास्त भेगाळलेली,  की त्याहून जास्त,  पावले? ... 

सख्या..

काळ्याभोर समुद्रात,  पांढरी होडी डुले,  आशेचे शीड झुले... 

सख्या...

संकटे, सांगून येत नाहीत कधी,  आणि एकटीही..  हातात हात घालून येतात..  मुकाबला करण्याचे बळही,  संकटेच देतात... 

सख्या..

अशा किती राती,  चंद्रकोरीच्या निळाईतल्या..  किती प्रभाती,  शुक्राच्या संगतीतल्या..  किती उर्मी मनातल्या,  किनाऱ्याशी थरथरल्या... 

सख्या...

खरा त्रास तेव्हाच असतो,  जेव्हा बोलण्यासारखं खूप काही असतं,  आणि तोंडाला  कुलूप  असतं... 

सख्या...

राघू सोबत मनही उडाले,  अन  भूतकाळाच्या डहाळीवर बसले..  मन रंगले, मोहरले नि रमले,  मग तेथून कधीही न उडाले... 

सख्या...

गुलमोहराच्या पालवीत,  भगवी, केशरी फुले..  केशरी फुलांतून,  हिरवे राघू उडाले... 

लाटा..

समुद्राच्या खळखळ लाटा,  तक्रारी करत किनारी येणार,  फेस क्षणभर आनंद देणार..    मी मात्र वाट बघत राहणार,  फेस न विरणाऱ्या लाटेची.... 

बोगन..

शांत तिन्हीसांजेला,  मंद केशरी दिवेलागण..  आळविते संध्याराग,  लाल जांभळी बोगण... 

सख्या...

मी समजावलंय माझ्या मनाला,  कुणाला  आपलं म्हणून,  कोणी आपलं  होत  नसतं.. 

सख्या...

गुंतलेल्या  धाग्यात,  कुणी मोती ओवत नाही..  कारण, धागाच तर  टिकत  नाही... 

लाटांनो...

सयांनो लाटांनो,  अशा का ग कुरबुरी?  या ग धावत किनारी,  गडे, भेटा उराउरी.... 

लाट...

लाट ही लाटच असते..  तिचा आवेग ओसरला, की कळते..  ती येऊन गेली....