Monday, April 19, 2010

लालबाग-परळ... -२-

फटाफट एकेक खाती बंद करत जाणारा खेतानशेट॥ त्याची बावळट, शेमळट मुद्रा, पण क्रूर, नीच वृत्ती.. त्याचा आणखीनच नीच जावई.. नाडली जाणारी कामगार मंडळी.. वाढत जाणारी लाचारी, चोऱ्या, लबाडी.. खरंच काही चांगलं, भलं उरलंच नाही का? तोतरा स्पीडब्रेकर नि त्याची सेना.. मर्कटसेनाच ती .. त्यांचे दारू पिणे, बंदुका चालवणे,शिवीगाळ करणे, त्या गरीब माणसाला खुर्चीला बांधून जो काही अनन्वित छळ केला, मारहाण,चावणे.. शीः .. पोटात ढवळून आले.. हे कमी म्हणून की काय, त्याला गोळ्या घालताना त्यांचे हिडिस हासणे.. आणि गोळ्या घालणे काय ते, एका गोळीत जीव गेला तरी वीस-तीस गोळ्या मारणे..प्रत्येक वेळी गोळी लागते तिथे उसळणारे रक्ताचे कारंजे..अरे, किती, किती दाखवाल? सूचक, प्रतीकात्मक काहीच नाही?
तेच प्रेमाच्या बाबतीत..नुसते हिसकावणे,ओरबाडणे, फसवणूक, व्यभिचार..आणि त्याला लाचार मान्यता, प्रत्यक्ष आईचीही!! नरूवर गोळ्या झाडल्या जातानाही नुसताच आक्रोश.. राग का नाही? हवा तिथे राग नाहीच.. आणि नको तिथे भीकमाग्या राग..आणखी ती सोज्वळ सई ताम्हणकर कशाला या असल्या चित्रपटात? म्हणजे उष्ट्या, चिवडलेल्या ताटात, कोंबडीच्या हाडकांत रसगुल्ला..कशाला घ्यावा तिने असला रोल?
अरे, वास्तव, वास्तव काय एवढेच आहे?आणखी काहीही दाखवण्यासारखे नाही?तुमच्याकडे त्यावर काही उत्तर नाही? भाष्य नाही? . आणि नाही, तर मग नुसते नागडेपण का दाखवता? ते काही कुणाला नवीन नाही...असे स्टन होउन,निःशब्द घरी परतलो. ते रक्त पाहिल्यावर खाण्या-पिण्याची इच्छाच नाही उरली.. डोळ्यासमोरची हिडिस दृश्ये जात नव्हती.. तीननंतर डोळे मिटले, दमून... काल दिवसभर कपाळात सूक्ष्मशी दूख होती, दमणूक होतीच.. सकाळी उठून बागेत फेरी मारली.. मोगरा डवरलेला पाहिला. .सुगंध नाकातून मनात भरला.. तेव्हां कुठे बरं वाटलं.......

लालबाग-परळ...-१-

परवा घाईघाईत पोचलो, लालबाग-परळ बघण्यासाठी.. रविवार असल्याने भरपूर प्रेक्षक होते..मला काही मजा नाही आली सिनेमा बघून..खरे तर, आतापर्यंत वाचनात आलेले चाळीतले जीवन किती गोड रंगवले गेले आहे। पण पुलंच्या चाळीची संपन्नता इथे कुठेच नाही दिसली‌। सगळा नुसता गलिच्छपणा आणि गचाळपणाच दाखवलाय.. माझी लीलामावशी रहायची ती दादरची खांडके चाळ, कुणाल राहतो ती परळ मधली चाळ॥ किती छान होत्या त्या! मग सुरू झाले ते केवळ ओंगळवाणेपण...गरीबी वेगळी नि दारिद्र्य वेगळे ना! गरीबीतही स्वच्छ घरात, स्वच्छ चारित्र्याने राहता येतं की॥वस्तूंच्या असण्या-नसण्याशी आयुष्याच्या संपन्नतेचा काय संबंध? पण मला वाटतं, इथे या सिनेमात सौंदर्य, संपन्नता यांना कुठे जागाच नव्हती। सायकलवाला, मटनवाला यांच्याशी झालेली किरकोळ भांडणं थेट मारहाणीपर्यंतच पोचली। लगेच तोंडं, नाकाडं फोडणे, रक्तपात सुरू.. मग सरळ दादाकडेच धाव.. मग सोटे,बंदुका..ते हाताळणारे कोवळे हात.. दारुच्या बाटल्या रिचवणारी कोवळी पोरं.. शेजारची सावर्डेकर मामी नि मोहन यांच्यावर लक्ष ठेवणारी पोरं.. ती ही कोवळीच..दुकानात बसून धुरींच्या मुलीला गटवणारा नि फसवणारा मारवाड्याचा तरुण मुलगा.. त्याच्या जाळ्यात फसणाऱ्या मुली कोवळ्याच.. मात्र जपायची ती कोवळीक जपली गेली नाही कुठेच!!

Friday, April 18, 2008

मीच वेडा...

'अरे खुशमन,जरा बाजुच्‍या गल्‍लीत जाऊन xerox करून आण बरं..'शेटजींची हाक ऐकू आली,नि मी भानावर आलो.
पटकन्‌ कागद घेऊन,मी copy काढायला गेलो.पायर्‍या चढतानाच समोर मोरपिशी पदर सळसळला.निळ्‍याशार
बांगड्‍यांनी भरलेल्‍या गोंडस हाताने,काचेचं दार ओढून घेत एक स्‍त्री अवखळपणे पायर्‍या उतरून गेली,नि खाली उभ्‍या
असलेल्‍या silver honda city मध्‍ये बसून,सर्रकन्‌ निघून गेली..गाडी स्‍वत: चालवत !! मी चकित होऊन बघतच राहिलो. डौलात निघताना,तिने किंचित तिरप्‍या नजरेने माझ्‍याकडे पाहिले का? खोडकर हसू ओठांवर येऊन, तिने ते दडवले का? की, मला भास झाला? नाही..भास कसा असेल? हो.. हसलीच ती ! ती, तीच होती !!
हां..,त्‍याचे असे झाले..मी जिथे watchman ची नोकरी करतो,ते काबरा emporium आणि axis bank शेजारी शेजारी
आहेत.चौक ओलांडताच, डाव्‍या हाताला या दोन्‍ही इमारती आहेत, त्‍यामुळे हिरवा सिग्‍नल मिळालेली वाहने या रस्‍त्‍या
वरून वेगाने पुढे जातात. आमच्‍या इमारती समोर जरा मोकळी जागा असल्‍याने, तिथे गाडी ठेवायचा मोह प्रत्‍येकालाच
होतो. खरं तर ही जागा आमच्‍या ग्राहकांसाठी आहे.पण bank मध्‍ये येणारे व आसपास कामे असणारे वाहनचालक सारखे
इथे गाड्‍या लावतातच; त्‍यामुळे मला फार सतर्क रहावे लागते. शक्‍यतो कुणाला मी गाडी ठेवू देत नाही; पण ही गाडी
सर्रकन्‌ येऊन थांबली, नि चालवणारे साहेब झटकन्‌ उतरून, झपाझप bank मध्‍ये गेले. बाजूला या बाईसाहेब बसलेल्‍या!
म्‍हणजे, जर गरज पडती, तर त्‍या गाडी काढू शकल्‍या असत्‍या..मी म्‍हंटलं, ठीक आहे,पाच मिनिटांनी बघू या..
पण, साहेब काही आले नाहीत. बाईसाहेब मस्‍त एसीची हवा खात, गाणी ऐकत बसल्‍या होत्‍या. मी वैतागून त्‍यांना गाडी
काढायची खूण केली, तर त्‍यांनी driving seat कडे इशारा केला.रस्‍त्‍यावर दोन्‍ही बाजूंनी येणार्‍या जाणार्‍या गाड्‍या मधूनच या गाडीमुळे अडत होत्‍या, नि जोरजोरात horn वाजवत होत्‍या; अशीच दहा-बारा मिनिटे गेली. मध्‍ये एकदा शेटजीही गाडी
काढायसाठी मला ओरडले. परत एकदा मी बाईंशी बोलायला गाडीजवळ गेलो. म्‍हंटलं,'काय हो बाईंजी,किती वेळ झाला?
traffic अडतंय ना..' त्‍या आपल्‍या काचेआड..परत मी,'पण इथे लावलीच का? मी तेव्‍हांच सांगत होतो ना..'मानेने
हो,हो, असे काहीसे सांगत त्‍यांनी सेल डायल केला..पण तो गाडीतच वाजला बहुतेक.. मी आपला बंद काचेवर बडबड
करत होतो.. मग मी काचेवर टकटक केलं; काच जराशी खाली सरकली.हातभर निळ्‍याशार बांगड्‍या खुळखुळ वाजवत
त्‍या गोंडस हाताने खुणावले, व मोरपिशी पदरामागून आवाज आला,'हमें गाडी चलाना नहीं आता जी...."
अरे रामा, आता करू तरी काय मी?? वैतागून मग एका लेनच्‍या गाड्‍या थांबवून, मी गाड्‍यांना पास दिला व रस्‍ता
मोकळा केला. तेवढ्‍यात कुठूनसे ते साहेब येऊन, ती गाडीही भुर्रकन्‌ निघून गेली. बघा ! झालं? मला काही बोलताही
आलं नाही त्‍यांना.. आणि म्‍हणजे....त्‍या बाईसाहेबांनी अगदी येड्‍यात काढलं की हो मला...!!
मी अगदी किंकर्तव्‍यविमूढ असाच झालो होतो...आणि या madam नी आत्ता मला ओळखलं होतं,नक्‍कीच !!
त्‍याशिवाय का ते खोडकर हसू डोकावलं होतं??......

Sunday, March 23, 2008

लघुतम कथा...

शेजारच्‍या नानी सांगत होत्‍या, त्‍यांची आईबापावेगळी नात आज उदास आहे म्‍हणून; तिच्‍या परवाच येणार्‍या वाढदिवसासाठी घेतलेला फ्राक फारच साधा, प्‍लेन आहे, तिला छान दिसणार नाही,म्‍हणून; म्‍हंटलं, माझ्‍याकडे पाठवा तिला..
ती frock घेऊन आली. रंग छान गुलाबी होता. तिला म्‍हंटलं, माझ्‍याकडची सोनेरी लेस छान, नागमोडी लावून देते. तर, तिला ते फारच आवडले. पण लौकर देशील ना? आता मला frock छान दिसेल,म्‍हणाली.. तिला काही खरेदीसाठी गावात जायचेहोते. मी बरोबर येऊ का, विचारलं, तर ड्रायव्‍हर रामचाचांना घेऊन जाते, म्‍हणाली. मी तिला थोडेसं प्रेम आणि विश्‍वास दिला, तर छान खुलून आली होती......
काल म्‍हणे, बिग बझारमध्‍ये, तिला चिडवणार्‍या नि चोरी करणार्‍या नऊ जणांना तिने पकडून दिले होते..
आत्‍मविश्‍वास वाढताच, तिच्‍याजवळच्‍या आहे त्‍याच शक्‍तीने, केवढी मोठी कामगिरी बजावली होती....

Wednesday, February 27, 2008

राज कपूर....

Sunday, August 19, 2007
राज कपूर..

लोकसत्‍ता वाचत होते.निळ्‍या डोळ्‍यांचा राजपुत्र अशा शीर्षकाखाली राज कपूरच्‍या चित्रपटांचा महोत्‍सव झी सिनेमा साजरा करणार असल्‍याची बातमी होती.ह्‍यांना सांगितल,तर म्‍हणाले, वाच ना सगळं मोठ्‍याने,....
"त्‍याच्‍या निळ्‍या डोळ्‍यात कायम स्‍वप्‍नं तरळत असायची.कपाळावर आलेले बेफिकीर केस,तोंडात सिगरेट आणि डोळ्‍यात जादूभरली निळाई घेऊन तो त्‍याच्‍या स्‍टुडिओत तासन्‌तास काम करायचा.राजस वर्ण,प्रभावी व्‍यक्‍तिमत्‍व, मधाळ हसू आणि अथांग निळे डोळे असलेला हा जादुगार लोकांना स्‍वप्‍ननगरीत नेण्‍यासाठी भव्‍यदिव्‍य अस एक विश्‍व उभारण्‍यात गढलेला असायचा. मग त्‍या स्‍टुडिओतून त्‍याची स्‍वप्‍नं चित्रपटगृहांत झळकायची, ..आणि... आणि लोक हरखून जायचे...
जाने ना नजर,पह..पहचाने..ज..जिगर...द..दम..भर जो उ..उधर म..मु..मुँह फे....फेरे
तेवढयात हे म्‍हणाले, अगं,अशी काय अडखळते आहेस वाचताना... हो ना, मलाही काही उमजेना......
तर झालं असं की,या ओळी बिना चालीच्‍या कधी म्‍हटल्‍याच नाहीत.. कधी म्‍हणणंही शक्‍य नाही.....
जणू या शब्‍दांत सूर built-in च होते........बघा ना तुम्‍हीही वाचून!!

Tuesday, February 26, 2008

असे आमचे लोकनेते...

Sunday, January 27, 2008
असे आमचे लोकनेते..

कालपासून डोके जरा भिरभिरलेलेच होते. शौरी आणि अमलचे बोरनहाण करायचे, तर तारखाच जमत नव्‍हत्‍या. त्‍यात दोन्‍ही मुलांच्‍या तब्‍येतींची कुरकुर.
ते तिळवण मुलांनी enjoy तर करायला हवे ना!
फोनाफोनी फार झाली, अन्‌ तारीख निघाली नाहीच. निघताना पुन: ह्‍यांची-माझी कटकट झालीच!
ते घरी राहून आवराआवरीची बरीच कामे करणार होते. कधी नव्‍हे तो मी free hand दिल्‍यावर,
त्‍यांना अगदी घाई झाली होती. कधी एकदा ही जात्‍ये, असे झाले होते. पण मला तसे दिसू तरी द्‌यायचे नव्‍हते ना! मला परत nobody loves me चे feeling आले..
झाले..लागले डोळे वाहायला! मग धडाधडा तयारी केली, नि निघाले एकदाची! भरीला बेगम अख्‍तरची गझल लावली नि शांतपणे रडत राहिले..
काल दोघांनी बेलापूरला जायचे ठरवले होते,पण मला एकटीलाच निघावे लागले.शनिवारी मोहरमची सुटी
आल्‍याने बँकेची कामे रखडली, सोमवारवर गेली.ती करण्‍यासाठी ह्‍यांना घरी राहणे भाग होते.
सगळं आवरताना निघायला बारा वाजले.तशी घाईही नव्‍हती, कारण मिनू चार वाजताच घरी येणार होती.
आता रस्‍ता जरा बरा झालाय नि वाहनांची गर्दीही आज कमी वाटली. जरा वेळाने लक्षात आले की, S.T.च्‍या बसेस जरा जास्‍तच जातायत, मुंबईच्‍या दिशेने.. मी काही फार वेगात नव्‍हते,
त्‍यामुळे बर्‍याच बसेस रोरावत मला overtake करत होत्‍या.
तासाभरात डोळेही कोरडे झाले,नि डोकेही जागेवर आले...तर, त्‍या सगळ्‍या बसेस भारतीय जनता पार्टीने hire केल्‍या होत्‍या.साठ तरी असतील. शिवाजी पार्कवर नरेन्‍द्र मोदींची जाहीत सभा होती,त्‍यासाठी मंडळी
निघाली होती. बसेस,खाजगी jeeps , cars चा ताफा निघाला होता, कुणाच्‍या खर्चाने,कोण जाणे!
एव्‍हांना दीड वाजत आला होता.हळूहळू रस्‍त्‍यात काही ठिकाणी थर्माकोलचे पेले, अर्धवट खाल्‍लेले lunch-packs यांचा सडा दिसू लागला. थांबलेल्‍या बसेस, भोवतीने त्‍या राजकारणी लोकांचा गराडा,
अन्‍नाची नासाडी.... सगळेच मन विषण्‍ण करणारे होते..
आता रागही यायला लागला. हा रस्‍ता आता four-lane होऊ घातलाय, तो असाच घाण ठेवणार आहोत का आपण?या नेत्‍यांची आणि पक्ष-कार्यकर्त्‍यांची हीच का जबाबदारीची जाणीव? ह्‍या लोकांना आपण निवडून देतो, ते समाजाची सेवा करायसाठी, की माज करण्‍यासाठी?
अन्‍न पिकवणारा शेतकरी आज आत्‍महत्‍यांच्‍या भोवर्‍यात सापडलाय, उध्‍वस्‍त होतोय,
आणि आपण अन्‍नाची अशी नासाडी करतोय? मग, एकेक आठवत राहिले...
श्रावण महिन्‍यात, ब्रह्‍मगिरीच्‍या फेरीनंतर मार्गभर पसरलेले चहादुधाचे पेले,खिचडीचा सडा.....
नवरात्रात, कालिकेच्‍या जत्रेनंतर सगळीकडे पसरलेला कचरा....
अनंतचतुर्दशी नंतर गणेशमूर्तींच्‍या अवशेषांनी विद्रूप बनलेले किनारे....
६डिसेंबरच्‍या मेळाव्‍यानंतर घाणेघाण झालेले शिवाजी पार्क....
कुंभमेळ्‍यानंतरचा गोदाघाट....
किती नि काय काय म्‍हणूनआठवायचे? नि येऊन-जाऊन घाणच आठवायची ना?
या ताफ्‍यातली ४० नंबरची बस बराच वेळ माझ्‍या पुढेच होती.मला अंतर राखावे लागत होते, नाही तर पिचकार्‍या screen वर आल्‍या असत्‍या ना!!
एका बसवर विजय सानेंच्‍या नावाचा फलक होता. हे आमचे इंदिरानगरवासी..पण ती बसही कचर्‍याने वेढलेलीच!मनाशी ठरवलं की यावर लिहायचेच.....photo ही घ्‍यायचे होते, पण एकटी होते, म्‍हणून गाडीतून नाही उतरले..
परवा, द्‍वारका सर्कलला सहा press-reporters ना, त्‍यांच्‍या तवेरा गाडीसकट kidnap करुन झोडले ना.......

प्राण्‍यांवरचे प्रेम...?

Monday, September 24, 2007
प्राण्‍यांवरचे प्रेम?..

नेहमीप्रमाणे walk साठी दोघे बाहेर पडलो.वळणाशीच आम्‍हांला बंटीने गाठले.मोठ्‍या खुशीने अंगावर उड्‍या-बिड्‍या मारुन त्‍याने आपला आनंद व्‍यक्‍त केला,नि आमच्‍याबरोबर walk ला येण्‍याचे जाहीर केले; नव्‍हे, आमच्‍यापुढे चालूही लागला.बंटी, शेजारच्‍या पाठककाकांचा कुत्रा. आता त्‍याने पाठककाकांना की काकांनी बंटीला disown केले,माहीत नाही, पण आता तो सगळ्‍या गल्‍लीचा कुत्रा आहे. वृत्तीने अतिशय प्रेमळ आहे, पण आल्‍या-गेल्‍यांवर चागलाच लक्ष ठेवून असतो.गल्‍लीत कोणी आलेले खपत नाही त्‍याला मुळीच! आमच्‍याबरोबर चालताना,मस्‍त शानमध्‍ये चालतो.वाटेत येणार्‍या लहानमोठ्‍या कुत्र्‍यांकडे अजिबात लक्ष देत नाही.कुणाच्‍या अध्‍यात-मध्‍यात नसतो.कुरापतीही काढत नाही. तर, असे आम्‍ही पाथर्डी फाट्‍याच्‍या दिशेने निघालो. साईबाबा मंदिराच्‍या अलिकडे, पांढरा कुर्ता-पायजमा घातलेले एक साठीचे गृहस्‍थ समोरून येताना दिसले. उंचे-पुरे,एकदम आडमाप. हातात साखळीने बांधलेला, लुकडासा, बिनशेपटीचा डोबरमन;दुसर्‍या हातात एक दणकट दांडू.. छडी नव्‍हे बरं.. दांडू! पूर्वी मी पाहिलं होतं, कुत्रे फिरवणार्‍यांच्‍या हातात एखादी छडी नाहीतर फांटी असायची,त्‍याने कुठे तोंड लावू नये,वा साखळीला ओढ देऊ नये म्‍हणून; पण इथे तर चांगला दंडा होता, आणि.... आणि काय होतय हे कळायच्‍या आत, त्‍या माणसाने कच्‌कन तो दंडा बंटीच्‍या पाठीत हाणला.. आईईग्‍ग.. बंटीबरोबरच मीही कळवळले. खरंतर बंटी अगदी सरळसोट चालत होता; खोडीही काढली नव्‍हती. त्‍याला इतक्‍या जोराने मारायचे काहीच कारण नव्‍हते. मी तर चांगलीच खवळले.
त्‍यांना म्‍हणाले,'वा: वा...हा चांगला न्‍याय आहे.स्‍वत:च्‍या कुत्‌र्‍यावर एवढं प्रेम करता,आणि तशाच दुसर्‍या कुत्‌र्‍याला इतक्‍या जोरात मारूच कसे शकता तुम्‍ही??काय हा राक्षसीपणा?'
तो;- 'ओ बाई,तो चावला असता ना ह्‍याला..'
मी;- 'अजिबात चावला नसता.तो सरळ चालत होता..का मारलंत त्‍याला उगीच?'
तो;- 'ओ..मग सुट्‍टा कुत्रा घेऊन कशाला फिरता? घरी ठेवा ना...'
मी;- 'मग तुम्‍हीच ठेवा ना तुमचा कुत्रा घरी, एवढी त्‍याला चावायची भीती वाटते तर!! कुत्‍र्‍याच्‍या प्रेमाचं एवढं प्रदर्शन करता.. तर हे तुमचं प्रेम झालं का? राक्षस कुठले! काही माणुसकी आहे की नाही?'
मग तो आणि मी..संतापात व्‍हायची तेवढी सगळी तूतू-मीमी झाली....हेही मग मोठा आवाज काढून माझ्‍या मदतीला धावले....मग,समोरून येणार्‍या एका काकांच्‍या जोडीने,'जाऊ दे हो,नका रागावू इतके'असे आम्‍हांला चुचकारले.. मग परत आम्‍ही तिघे पुढे चालू लागलो.संतापाने घामाघूम झालो होतो अगदी;डोळेही भरून आले होते.मनात प्रश्‍नांचा कल्‍लोळ ही उठला होता.....
- या म्‍हातार्‍याने दाखवलेले हे प्रेम?? हे कसले प्रेम?..
- पाळीव प्राण्‍याच्‍या गळ्‍यात साखळी घालून,त्‍याला बंधनात ठेवणे,हे प्रेम??..
- जो प्राणी त्‍या म्‍हातार्‍याचा पाळीव प्राणी आहे,तशाच दुसर्‍या प्राण्‍याला तो इतक्‍या जोरात मारू शकतो,हे प्रेम??
- आणि शेवटी, कुणी जर चूक दाखवली, तर त्‍याला उलट बोलून अपमानित करणे, हे प्रेम??
- कुत्‌र्‍यांच्‍या सारखीच माणसेही पिसाळायला लागली आहेत का हल्‍ली??.......