प्राण्‍यांवरचे प्रेम...?

Monday, September 24, 2007
प्राण्‍यांवरचे प्रेम?..

नेहमीप्रमाणे walk साठी दोघे बाहेर पडलो.वळणाशीच आम्‍हांला बंटीने गाठले.मोठ्‍या खुशीने अंगावर उड्‍या-बिड्‍या मारुन त्‍याने आपला आनंद व्‍यक्‍त केला,नि आमच्‍याबरोबर walk ला येण्‍याचे जाहीर केले; नव्‍हे, आमच्‍यापुढे चालूही लागला.बंटी, शेजारच्‍या पाठककाकांचा कुत्रा. आता त्‍याने पाठककाकांना की काकांनी बंटीला disown केले,माहीत नाही, पण आता तो सगळ्‍या गल्‍लीचा कुत्रा आहे. वृत्तीने अतिशय प्रेमळ आहे, पण आल्‍या-गेल्‍यांवर चागलाच लक्ष ठेवून असतो.गल्‍लीत कोणी आलेले खपत नाही त्‍याला मुळीच! आमच्‍याबरोबर चालताना,मस्‍त शानमध्‍ये चालतो.वाटेत येणार्‍या लहानमोठ्‍या कुत्र्‍यांकडे अजिबात लक्ष देत नाही.कुणाच्‍या अध्‍यात-मध्‍यात नसतो.कुरापतीही काढत नाही. तर, असे आम्‍ही पाथर्डी फाट्‍याच्‍या दिशेने निघालो. साईबाबा मंदिराच्‍या अलिकडे, पांढरा कुर्ता-पायजमा घातलेले एक साठीचे गृहस्‍थ समोरून येताना दिसले. उंचे-पुरे,एकदम आडमाप. हातात साखळीने बांधलेला, लुकडासा, बिनशेपटीचा डोबरमन;दुसर्‍या हातात एक दणकट दांडू.. छडी नव्‍हे बरं.. दांडू! पूर्वी मी पाहिलं होतं, कुत्रे फिरवणार्‍यांच्‍या हातात एखादी छडी नाहीतर फांटी असायची,त्‍याने कुठे तोंड लावू नये,वा साखळीला ओढ देऊ नये म्‍हणून; पण इथे तर चांगला दंडा होता, आणि.... आणि काय होतय हे कळायच्‍या आत, त्‍या माणसाने कच्‌कन तो दंडा बंटीच्‍या पाठीत हाणला.. आईईग्‍ग.. बंटीबरोबरच मीही कळवळले. खरंतर बंटी अगदी सरळसोट चालत होता; खोडीही काढली नव्‍हती. त्‍याला इतक्‍या जोराने मारायचे काहीच कारण नव्‍हते. मी तर चांगलीच खवळले.
त्‍यांना म्‍हणाले,'वा: वा...हा चांगला न्‍याय आहे.स्‍वत:च्‍या कुत्‌र्‍यावर एवढं प्रेम करता,आणि तशाच दुसर्‍या कुत्‌र्‍याला इतक्‍या जोरात मारूच कसे शकता तुम्‍ही??काय हा राक्षसीपणा?'
तो;- 'ओ बाई,तो चावला असता ना ह्‍याला..'
मी;- 'अजिबात चावला नसता.तो सरळ चालत होता..का मारलंत त्‍याला उगीच?'
तो;- 'ओ..मग सुट्‍टा कुत्रा घेऊन कशाला फिरता? घरी ठेवा ना...'
मी;- 'मग तुम्‍हीच ठेवा ना तुमचा कुत्रा घरी, एवढी त्‍याला चावायची भीती वाटते तर!! कुत्‍र्‍याच्‍या प्रेमाचं एवढं प्रदर्शन करता.. तर हे तुमचं प्रेम झालं का? राक्षस कुठले! काही माणुसकी आहे की नाही?'
मग तो आणि मी..संतापात व्‍हायची तेवढी सगळी तूतू-मीमी झाली....हेही मग मोठा आवाज काढून माझ्‍या मदतीला धावले....मग,समोरून येणार्‍या एका काकांच्‍या जोडीने,'जाऊ दे हो,नका रागावू इतके'असे आम्‍हांला चुचकारले.. मग परत आम्‍ही तिघे पुढे चालू लागलो.संतापाने घामाघूम झालो होतो अगदी;डोळेही भरून आले होते.मनात प्रश्‍नांचा कल्‍लोळ ही उठला होता.....
- या म्‍हातार्‍याने दाखवलेले हे प्रेम?? हे कसले प्रेम?..
- पाळीव प्राण्‍याच्‍या गळ्‍यात साखळी घालून,त्‍याला बंधनात ठेवणे,हे प्रेम??..
- जो प्राणी त्‍या म्‍हातार्‍याचा पाळीव प्राणी आहे,तशाच दुसर्‍या प्राण्‍याला तो इतक्‍या जोरात मारू शकतो,हे प्रेम??
- आणि शेवटी, कुणी जर चूक दाखवली, तर त्‍याला उलट बोलून अपमानित करणे, हे प्रेम??
- कुत्‌र्‍यांच्‍या सारखीच माणसेही पिसाळायला लागली आहेत का हल्‍ली??.......

Comments

.. said…
छानच.
खरंच.. तुमचे विचार खूप सुंदर आहेत..
sonal m m said…
बंटी गेला जीवानिशी, पाठक बिचारे वाचले नाही का :) काय म्‍हणावे आता !!

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

उपनिषद चिंतन : - २