तू सांग , नाही तर , सांगू नकोस काही .. ते तुझ्या -माझ्यातलं, विरूनसं गेलंय कांही ... आठवतंय ना पाणंदीवर ? गवताच्या पात्यांवर , चमकणारं ते दहिवर.. त्यांच्या चिमुकल्या आकाशात, सारं विश्व थरथरत राही .. त्यांत भिजत पावलं , तुझीही , माझीही .. तुझ्या ओल्या पावलांचा , आज माग सापडत नाही .. ते तुझ्या -माझ्यातलं , विरूनसं गेलंय काही .... किती गूज करत , बसलो त्या कातळावर .. दाखवलं होतंस मला , ते रानफूल लाजणारं.. खुडलं नाहीस तूही , नाही खुडलं मीही .. कुठे दूर वाऱ्याबरोबर , उडून गेलं का तेही ? गंध मात्र माझ्याभोवती , अजून दरवळत राही ... तू सांग, नाहीतर , सांगू नकोस काही .. ते तुझ्या माझ्यातलं , विरूनसं गेलंय कांही .......