Posts

Showing posts from September, 2007

संध्‍या-सागर..

वेगवेगळ्‍या रंगांनी तरुण बनलेल्‍या सागराने संध्‍येला विचारले, "हे संध्‍या,तुझ्‍यामुळेच माझ्‍या सबंध शरीराचा रंग बदलतो आणि मला विलक्षण सौंदर्य प्राप्‍त होते. मला तुला एवढेच सांगायचे आहे की,माझ्‍यात रूप नाही की रंग..माझा देह तरल आहे.. माझ्‍या देहाचा कण नि कण खरबरीत आहे.असे असून तू माझ्‍यावर का झुकतेस?" संध्‍येने उत्तर दिले,"तू कसा आहेस हे मला सारे ठाऊक आहे.तुझ्‍या स्‍वभावाचा काही अंत नाही. क्षणात वेडा होऊन नाचशील,तर क्षणात निराश होऊन बसशील.तू खारट आहेस.पण मला माहीत आहे, तुझ्‍यापाशी फक्‍त दोन वस्‍तू आहेत.एक म्हणजे,तू सार्‍या जगातला कचरा एकत्र करून त्‍याचे अमृत बनवतोस. दुसरे म्‍हणजे,तुझ्‍यात जो अफाटपणा नि मस्‍ती आहे,तशी कोणातही नाही.आणि म्‍हणून मी माझे सर्वस्‍व तुला अर्पण करते..बोल,आणखी काही म्‍हणायचेय?" सागर मुका झाला......

प्रकाश आणि काळोख

एकदा प्रकाशाचे आणि काळोखाचे श्रेष्‍ठत्वावरून भांडण झाले.प्रकाशाने काळोखाला म्‍हंटले, "काय रे,सगळे काही 'गुडुप' करणारा स्‍वभाव तुझा! मी बघ कसा, सर्व काही 'उजळ' करणारा..सर्वांना दृष्‍टी देणारा".. काळोख शांतपणे म्‍हणाला, "कशाला हवास रे तू? फक्‍त काळे-गोरे बघायला? दृष्‍टी देऊन दृष्‍टिकोण वजा करणारा? मी बघ कसा,माझ्‍या मिठीत सामावून घेतो सर्वांना..माझ्‍या उपस्‍थितीत सांगू शकणार का, कोण काळा आणि कोण गोरा ते? ..." प्रकाश निरुत्तर झाला, आणि काळोखात सामावून गेला....